कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या ११ जून रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील उद्योग क्षेत्रात राजकीय व व्यावसायिक हालचालींना वेग आला आहे. अशातच कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने एकता पॅनेलला जाहीर आणि ठाम पाठिंबा देत सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या या निवडणुकीत यापूर्वीच तरुण, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले रवींद्र माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, कोकण विभागातील काही जागांवर एकमत न झाल्याने निवडणूक होणार आहे.
विद्यमान अध्यक्ष रवींद्र माणगावे, माजी अध्यक्ष खुशालभाई पोंदार, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल लोढा आणि माजी कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकता पॅनेलचे उमेदवार मैदानात उतरले असून त्यांना उद्योग क्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदासाठी डॉ. संतोष राणे हे उमेदवार आहेत. युनियन बँकेतील वरिष्ठ प्रबंधक पदावरून निवृत्त झाल्यानंतर बांबू उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. तर गव्हर्निंग कौन्सिलसाठी ॲड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, मनोज वालावलकर, मिलिंद प्रभू, विजय केनवडेकर, पुंडलिक (विशाल) परब आणि कुणाल वरसकर हे उमेदवार रिंगणात आहेत.
हे सर्व उमेदवार विविध क्षेत्रांतील अनुभव, उद्योगविकासाची दृष्टी आणि सकारात्मक विचारसरणी घेऊन काम करणारे असून सिंधुदुर्गच्या औद्योगिक प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या विशेष बैठकीत बोलताना अध्यक्ष व उद्योजक मोहन होडावडेकर यांनी, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरमध्ये कोकणाचे प्रभावी प्रतिनिधित्व आवश्यक आहे. त्यासाठी एकता पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत,” असे आवाहन सभासदांना केले.
यावेळी असोसिएशनच्या वतीने एकता पॅनेलला अधिकृत आणि संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला, त्यामुळे निवडणुकीपूर्वीच एकता पॅनेलची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



