‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे गावातील प्रमुख ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, आगामी पावसाळा आणि शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास ८ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा नेमळे ग्रामपंचायतीने दिला आहे.

नेमळे गावातून जाणारे ग्रामीण रस्ते तळवडे, मळगाव, कमळेवीर, वेंगुर्ला तसेच झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असल्याने या मार्गांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामपंचायत कार्यालय मार्ग, ग्रामपंचायत ते दलितवस्ती रस्ता तसेच पाटकरवाडी ते कमळेवीर-तळवडे मार्ग यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालक खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नेमळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

यासंदर्भात नेमळे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ८ जून रोजी ग्रामस्थांच्या सहभागातून आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी उपसरपंच सखाराम राऊळ, एकनाथ राऊळ, विक्रम पांगम, मिलिंद नेमळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles