मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाराज नेत्यांना खुष करण्यासाठी त्यांची महामंडळांवर नियुक्ती केली. यात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना थेट एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. पण ते पदभार स्वीकारतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण पदभार स्वीकारू, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र अजूनही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुका काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. नेमके तेच लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, आनंदराव आडसूळ आणि माजी खासदार हेमंत पाटील यांची महामंडळावर वर्णी लावली. त्यानंतर आमदार भरत गोगावलेंनाही एसटी महामंडळपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या गोगावलेंनी मात्र त्यावर विचार करू, असा मेसेज दिल्याने याबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
मंत्रिपद अपेक्षित असताना भरत गोगावलेंना एक-दीड महिन्यासाठी महामंडळ देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहे. त्यावर भरत गोगावलेंनी काहीशी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करून एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी काम करत होतो. थोड्या दिवसांसाठी कशासाठी यामध्ये अडकून बसायचे, असा सवालही त्यांनी या दरम्यान उपस्थित केला आहे.