कणकवली : शालेय विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक खेळांची कार्यशाळा राजे प्रतिष्ठान सिंधूचा व ओसरगाव नंबर 1 शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेस स्मिता नलावडे (जिल्हा समन्वयक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग), सूर्यकांत चव्हाण (केंद्रप्रमुख बोर्डवे), चंद्रसेन पाताडे (अध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी), जीवबा अपराज (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती ओसरगाव नंबर १) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राजे प्रतिष्ठान सिंधू व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर 1 यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब, लाठी–काठी व धनुर्विद्या या पारंपरिक खेळांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 ते 11.00 या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेसाठी CISF चे निवृत्त अधिकारी श्री. बाळकृष्ण कवळे हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास व भारतीय परंपरेशी नाते जोडणारे हे खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
या उपक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष श्री. विवेक परब, आणि मुख्याध्यापक श्री. किशोर कदम यांनी केले आहे.
राजे प्रतिष्ठान सिंधू ही संस्था जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये बालकुमार साहित्य संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, नवयुवकांसाठी विविध स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश आहे. तसेच कोरोना काळात संस्थेने समाजासाठी मोलाची व जबाबदारीची भूमिका बजावत उल्लेखनीय कार्य केले आहे.
या पारंपरिक खेळांना अधिक प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना जिल्हा व राज्यस्तरीय संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राजे प्रतिष्ठान सिंधू प्रयत्न करेल.तरी
हा उपक्रम केवळ कार्यशाळा नसून विद्यार्थ्यांच्या मनात शौर्य, शिस्त व संस्कार रुजवणारा एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.



