वेंगुर्ला: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा यावर्षीचा ‘नादब्रह्म’ युवा महोत्सव दिनांक १२ व १३ जानेवारी २०२६ रोजी सिद्धिविनायक हॉल, वेंगुर्ला येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाविद्यालयातील अधिकाधिक युवक-युवतींनी आपली कला सादर करून सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले आहे.
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, नामांकित बांधकाम व्यवसायिक रघुवीर उर्फ भाई मंत्री, युवा नेते विशाल परब, तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या महोत्सवाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
तसेच शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर यांचे अध्यक्ष श्रीम. शिवानी देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई आणि प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे हे मान्यवर देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन व संवर्धन, तसेच युवकांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि सांस्कृतिक जाणीवा दृढ करणे, या दृष्टीने हा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या महोत्सवाच्या कालावधीत पारंपरिक लोकनृत्य, काव्यवाचन, फॅशन शो, उत्कृष्ट वेशभूषा, एकांकिका, गायन-वादन अशा विविध सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि कलात्मकता अधिक वृद्धिंगत होणार आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या संयुक्त व बहुमोल सहकार्यातून या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ‘नादब्रह्म’ युवा महोत्सवाला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभेल आणि हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जीवनात एक संस्मरणीय ठसा उमटवेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



