ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक गुंतवणुकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून सागर कारिवडेकर नामक इसमाने लाखो रूपयांना चुना लावल्याचे आणि आता तो बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी, की ठाणेस्थित सुप्रसिद्ध शेअर ट्रेडिंग प्रशिक्षक आणि व्यावसायिक असलेल्या राणे दांपत्याच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन सागर कारिवडेकर नामक इसमाने अनेक गुंतवणुकदारांना शेअर ट्रेडिंगमधून मोठ्या रकमेचा लाभ मिळेल असे लेखी आश्वासन दिले. काही गुंतवणुकदारांनी सुरूवातीला मर्यादित रक्कमेची गुंतवणूक केली. त्यांना सुरूवातीला चांगला फायदा झाला. ते पाहून, सागर कारिवडेकर याच्यावर गुंतवणुकदारांचा विश्वास बसला आणि त्यांनी त्याच्याकडे मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केली.
मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणुकदारांनी केलेली सुमारे पंचवीस कोटीपेक्षा अधिक रक्कमेची गुंतवणूक घेऊन सागर सुबोध कारिवडेकर याने आता पोबारा केल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या घेऊन तो लपून बसल्याचीही माहिती पिडीत गुंतवणुकदारांसमोर आली आहे.
गुंतवणुकदारांनी ठाणेस्थित सचिन राणे व प्रिती राणे यांच्या ओळखीतून आलेल्या या ठकसेनावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती त्यामुळे आता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांकडून राणे दांपत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे प्रिती राणे आणि सचिन राणे तसेच त्यांचे कुटुंबिय फार मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. सर्व गुंतवणूकदारांनाही पुढे काय करावे असा यक्षप्रश्न पडला आहे.
याबाबतीत संबंधित सागर कारिवडेकर याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणातील संबंधित सचिन राणे व प्रिती राणे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी स्वतःदेखील सागर सुबोध कारिवडेकर याच्याकडे गुंतवणूक केली असून, तीदेखील त्याने परत केली नसल्याबाबत आणि सागर कारिवडेकरविरोधात ते लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याबाबत माहिती दिली आहे. काही गुंतवणूकदारांकडून राणे यांना या घटनेसाठी जबाबदार धरले जात आहे मात्र सर्व कागदोपत्री तसेच खात्यावरील जमा रक्कमेचा व्यवहार हा सागर कारिवडेकरच्या व्यक्तिगत खात्यावर झालेला असल्याने आणि आपल्या ओळखीचा सागर कारिवडेकर याने गैरवापर केल्याने हा अनर्थ झाला असून गुंतवणूकदारांनी आता संयम ठेवून पावले उचलण्याची गरज असल्याचे श्री सचिन राणे यांनी सांगितले. त्यांनी स्वतः सागर कारिवडेकर याच्याविरोधात ठाणे पोलीसात लेखी तक्रारदेखील दाखल केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या तक्रारीवरून लवकरच सागर कारिवडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल होईल अशी शक्यता श्री सचिन राणे यांनी व्यक्त केली.
सागर कारिवडेकर याला पोलीस लवकरच ताब्यात घेतील असा विश्वास राणे दांपत्याकडून व्यक्त केला गेला असून, या पार्श्वभूमीवर सर्वच शेअर मार्केट गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.


