दिड तपाच्या निस्वार्थ समाजसेवेचा सन्मान!, दयानंद कुबल यांना ‘ब्रँड्स ऑफ कोंकण अवॉर्ड प्रदान!

समाजकारणातील कर्तृत्वाचा सन्मान! 

सावंतवाडी : सकाळ मीडिया समूहाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी दिला जाणारा “ब्रँड्स ऑफ कोंकण अवॉर्ड” यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक नेतृत्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे श्री. दयानंद श्रीराम कुबल यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी, हॉटेल सावंत पॅलेस, रत्नागिरी येथे पार पाडण्यात आला. हा पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनश्री कडगांवकर तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कल्याण, जनहित आणि समुदाय विकासासाठी गेल्या १७ वर्षांपासून त्यांनी केलेल्या निस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला.

श्री. दयानंद कुबल यांनी समाजसेवा ही केवळ उपक्रम न मानता ती जीवनशैली म्हणून स्वीकारली असून, तळागाळातील नागरिकांपर्यंत थेट पोहोचून कार्य करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. त्यांच्या या दीर्घकालीन, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक सामाजिक कार्याची दखल घेत २०२५ मध्ये त्यांना सर रतन टाटा अवॉर्ड तसेच कोकण सन्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य, पूर व नैसर्गिक संकटांच्या काळात तात्काळ मदत, ग्रामीण व सामुदायिक विकासाचे उपक्रम तसेच सार्वजनिक हितासाठी राबवलेल्या विविध सामाजिक मोहिमा हे त्यांच्या कार्याचे प्रमुख घटक राहिले आहेत. सातत्य, पारदर्शकता आणि लोकांशी थेट संवाद या मूल्यांमुळे त्यांच्या उपक्रमांतून समाजात प्रत्यक्ष आणि मोजता येईल असा सकारात्मक बदल घडून आला आहे.

“ब्रँड्स ऑफ कोंकण अवॉर्ड” हा पुरस्कार केवळ व्यक्तीगत सन्मान नसून सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या नेतृत्वाचा गौरव मानला जातो. कोकणातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना ओळख मिळावी, समाजकारणात सकारात्मक उदाहरणे निर्माण व्हावीत आणि युवकांना समाजसेवेकडे आकर्षित करता यावे, या उद्देशाने सकाळ मीडिया समूहाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारताना कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी सांगितले की, “हा सन्मान केवळ माझा किंवा संस्थेचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र कार्य करणारे आमचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, दाते, सहकार्य संस्था आणि आमच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. या पुरस्कारामुळे आमच्यावर अधिक जबाबदारी आली असून समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू.”

अशा पुरस्कारांमुळे समाजसेवेत कार्यरत असलेल्या इतर व्यक्ती आणि संस्थांनाही नवी दिशा व प्रोत्साहन मिळते. सकाळ मीडिया समूहाने उचललेल्या या सकारात्मक उपक्रमामुळे सामाजिक कार्य ही केवळ व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना समाजात अधिक दृढ होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles