बॅ. खर्डेकर महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त ‘माणकूर’ आंबा रोपांचे वृक्षारोपण! ; फळबागांतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा संकल्प.

वेंगुर्ले : येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात आणि विधायक उपक्रमाने साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात शंभर ‘माणकूर’ प्रजातीच्या आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरणाचा आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. व्ही.पी.नंदगिरीकर यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. महाराजांची विलक्षण संघटन वृत्ती, प्रशासन कौशल्य, प्रभावी राजनीती आणि विशेषतः जलदुर्गांच्या उभारणीतून त्यांनी सिद्ध केलेले आपले सामर्थ्य यावर त्यांनी भाष्य केले.


या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख प्रा.संजीव चमणकर यांनी विशेष पुढाकार घेत गोवा माणकूर प्रजातीची १०० आंब्याची झाडे भेट म्हणून दिली. वृक्षारोपणाच्या या मोहिमेबद्दल बोलताना प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये केवळ शोभेची झाडे न लावता फळबागांच्या रूपाने भविष्यातील एक उत्तम उत्पन्नाचा स्त्रोत तयार व्हावा, हा या वृक्षारोपणाचा मूळ हेतू आहे.
या मोहिमेत महाविद्यालयातील एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवरायांच्या घोषणांना उपस्थित प्राध्यापकांनीही जोरदार दाद दिली. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मिळून श्रमदानातून खोदलेल्या शंभर खड्ड्यांमध्ये ही झाडे लावून वृक्षारोपणाचा संकल्प पूर्णत्वास नेला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन कनिष्ठ विभागातील हॉर्टिकल्चर विभागाचे प्राध्यापक श्री. वीरेंद्र देसाई यांनी केले. याच कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनश्री पाटील यांनी आगामी ‘शिवराज भूषण’ या नाट्यप्रयोगास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. विवेक चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles