मुंबई : काही रिअॅलिटी शोमधले स्पर्धक प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करतात. एवढं की, कॅमेरे बंद झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात. त्यापैकीच एक फिटनेस मॉडल मयंक पवार वयाच्या 37व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मयंकच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्वासोबतच फिटनेस वर्ल्डही हादरलं आहे. फिटनेस फ्रिक असलेल्या मयंक पवारनं तब्बल 7 वेळा ‘मिस्टर इंडिया’ हा खिताब पटकावलेला. तर, त्यासोबतच ‘मिस्टर एशिया’ हा बहुमानही मिळवलेला. अनेकांचा रोल मॉडल असलेल्या मराठमोळ्या मयंक पवारच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे. मयंकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या निधनाची माहिती देण्यात आलीय.
मयंक पवारच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहते आणखी हैराण झालेले आहेत. दरम्यान, 1 जानेवारी 2026 ला मयंकनं आपला वाढदिवस साजरा केलेला. तसेच, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन पॉझिटिव्ह मेसेजही दिलेला. सध्या मयंकच्या इन्स्टाग्रामवरुन करण्यात आलेली त्याच्या निधनाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्याला केवळ एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून नव्हे तर एक भाऊ, चॅम्पियन, मार्गदर्शक आणि प्रेरणा म्हणून वर्णन केलं आहे. पोस्टमध्ये लिहिलंय की, “एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणा… मयंक पवार नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील. कृपया आमच्या प्रार्थना आणि श्रद्धांजलीमध्ये सामील व्हा… ओम शांती…”
मयंक पवार ‘स्प्लिट्सव्हिला 7’मध्येही सहभागी झालेला. त्यानं तिथे सर्वांना आपलंस करुन घेतलेलं. ज्यावेळी ‘स्प्लिट्सव्हिला 7’मधून मयंक बाहेर पडला, तेव्हा सनी लिओनी रडलेली. नेमकं तेव्हा काय घडलेलं, जाणून घेऊयात सविस्तर…
फिटनेस मॉडलनं सनी लिओनीला रडवलेलं, नेमकं काय घडलेलं?
एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन 7 मध्ये सहभागी झाल्यानंतर मराठमोळा मयंक पवार घराघरात पोहोचलेला. त्याची सुंदर शरीरयष्टी, सरळ पण थेट बोलणं आणि मैत्रीपूर्ण स्वभाव यामुळे तो शोच्या सर्वात आवडत्या स्पर्धकांपैकी एक बनला. प्रेक्षकांनी त्याची प्रामाणिकता आणि खिलाडूवृत्तीचं खूप कौतुक केलेलं.
शो दरम्यान, त्यानं होस्ट सनी लिओन आणि निखिल चिनप्पा यांचीही मनं जिंकलेली. त्याचं शोमधलं एलिमिनेशन हे त्या सीझनमधील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक होतं. सनी लिओनी खूपच भावुक झालेली आणि निखिल चिनप्पानं त्याला कडकडून मिठी मारून निरोप दिलेला. एका टास्क दरम्यान दुखापत झाली असूनही, मयंकनं खंबीर राहून पूर्ण जोशानं कामगिरी केली. त्याचे कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्याला चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळालंय.
रिअॅलिटी शोच्या पलीकडे, मयंक फिटनेस जगतातही एक प्रमुख व्यक्ती होता. त्यानं सात वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता. एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून, त्यानं अनेकांना शिस्त, आरोग्य आणि मानसिक ताकद राखण्यासाठी प्रेरित केलंय.



