✍️ रुपेश पाटील.
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागून जवळपास तीन आठवडे उलटले… कार्यकर्त्यांच्या गप्पा, नेत्यांच्या गाठीभेटी, आणि “कोण बसणार खुर्चीवर?” याची चर्चा गावोगावी रंगली होती. अखेर सस्पेन्स संपला! जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. आणि आता सिंधुदुर्गच्या राजकारणात तापमान चांगलंच वाढलंय!
९ मार्चला तालुक्यांच्या ‘कारभाऱ्यां’चा फैसला!
जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदासाठीची निवडणूक ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार. याच दिवशी आठ तालुक्यांचा कारभार कोणाच्या हाती जाणार, यावर शिक्कामोर्तब होईल. पडद्यामागे आकडेमोड, संपर्क मोहीम आणि “शब्द दे-शब्द घे”ची लगबग आधीच सुरू झाली आहे.
१६ मार्चला जिल्हा परिषदेच्या ‘बिग बॉस’ची निवड!
यानंतर १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडेल. जिल्ह्याच्या सत्ताकेंद्रावर कोणाची पकड बसणार, याचा हा निर्णायक क्षण असेल.
निकालानंतरचा ‘थंडावा’ संपला, राजकीय पारा चढला!
९ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेची उलटगणती सुरू झाली होती. मात्र तारखा न जाहीर झाल्याने राजकारण थोडं शांत होतं. आता वेळापत्रक समोर येताच गट-तटाच्या बैठका, रात्री उशिरापर्यंतच्या चर्चा आणि बहुमतासाठीची धडपड वेगाने सुरू झाली आहे. “फोडाफोडी”च्या कुजबुजीलाही उधाण आलंय.
पुढचे काही दिवस निर्णायक –
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. काही ठिकाणी अपक्ष सदस्य ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुढील आठवडा सिंधुदुर्गच्या राजकारणासाठी अत्यंत नाट्यमय ठरणार, यात शंका नाही.



