दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’, न्यूझीलंडची टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक! ; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक!

कोलकाता : कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह न्यूझीलंडने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती, परंतु बाद फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशाच पडली. पण मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या सवयीमुळे चोकर्स हा शिक्का पुसण्यात दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा अपयश आले असून त्यांचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले आहे.

दक्षिण आफ्रिकेची धक्कादायक सुरुवात –

उपांत्य फेरीत नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात कोल मॅककॉन्चीने दक्षिण आफ्रिकेला सलग दोन धक्के दिले. आधी त्याने क्विंटन डी कॉकला 8 चेंडूत 10 धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच पुढील चेंडूवर रायन रिकेल्टनला शून्यावर माघारी पाठवत मॅककॉन्चीने आफ्रिकेची अवस्था बिकट केली. 55 धावांवर कर्णधार एडन मार्कराम (20 चेंडूत 18 धावा) रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि तिसरा मोठा धक्का बसला. त्यानंतर 10वे आणि 11वे षटक आफ्रिकेसाठी आणखी घातक ठरले. रचिन रवींद्रने डेव्हिड मिलरला अवघ्या 6 धावांवर बाद केले, तर पुढील षटकात कोल मॅककॉन्चीने सेट फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला 27 चेंडूत 34 धावांवर माघारी धाडले.

77 धावांवर पाच विकेट्स, नंतर मार्को यानसेनचा ‘शो’ –

77 धावांवर पाच विकेट्स पडल्यावर ट्रिस्टन स्टब्स आणि मार्को यानसेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला स्थिरता दिली. मात्र 150 धावांवर लॉकी फर्ग्युसनने स्टब्सला 29 धावांवर बाद करत भागीदारी मोडली. एकीकडे विकेट्स पडत असताना मार्को यानसेन शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहिला. त्याने अवघ्या 30 चेंडूत नाबाद 55 धावांची झंझावाती खेळी करत संघाचा डाव 169 धावांपर्यंत नेला. यानसेनच्या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, कोल मॅककॉन्ची आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर जिमी नीशम आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक यश मिळवले.

फिन अ‍ॅलनने ठोकले शतक; न्यूझीलंडने थेट फायनलमध्ये मारली धडक –

दक्षिण आफ्रिकेने 169 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभारला. मात्र हे लक्ष्य न्यूझीलंडसाठी काहीच कठीण ठरले नाही. कीवी संघाने अवघ्या 12.5 षटकांत 173 धावा करत सामना 9 विकेट्सनी जिंकला आणि फायनलचे तिकीट पक्के केले. या विजयाचा खरा नायक ठरला फिन अ‍ॅलन. अ‍ॅलनने अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावत टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाची नोंद केली. त्याच्या आक्रमक फलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले. न्यूझीलंडच्या या दणदणीत विजयाने संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. आता कीवी संघ अंतिम फेरीत कोणाशी भिडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles