सावंतवाडी : येथील सर्वोदय नगर येथे सर्वोदय नगर रहिवासी संघ आणि सर्वोदय नगर महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून हा कार्यक्रम सर्वोदय नगर गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे.
आज या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता होणार असून रात्री १० वाजेपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील महिलांसाठी विशेष खेळ, पैठणी स्पर्धा तसेच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व रहिवासी बांधवांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. तसेच उपस्थित महिलांनी विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रहिवासी संघाच्या महिला अध्यक्षा सौ. दिशा कामत, महिला सेक्रेटरी सौ. शरयू बार्देसकर तसेच महिला सचिव सौ. मेघना राऊळ यांनी विशेष पुढाकार घेतला असून सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रहिवासी संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ, या प्रभागाचे नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका नीलम नाईक यांनी केले आहे.
महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन रहिवासी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



