सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव येथे श्रीमती उज्ज्वला चंद्रकांत खानोलकर/पटेकर पुस्तक व कै. चंद्रकांत धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. कावेरी कासरलकर – मयेकर उपस्थित होत्या. तर ग्रंथालयातील पहिल्या कर्तबगार सन्मानित महिला म्हणून डॉ. सौ. अर्चिता मिलिंद खानोलकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रथम सन्मानित महिला म्हणून सौ. ललिता प्रभाकर तेली उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी डॉ. सौ. अर्चिता मिलिंद खानोलकर यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी सौ. कावेरी कासारलकर/मयेकर यांच्या हस्ते हा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन वाचन सेविका सौ. स्मिता रवींद्र नाईक यांनी केले.
प्रमुख अतिथी सौ. कावेरी कासरलकर-मयेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी शिक्षणासोबत विविध कला आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतःची काळजी घेत आत्मविश्वासाने पुढे जावे, वाचनाची सवय लावावी व समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

सत्कारमूर्ती डॉ. अर्चिता मिलिंद खानोलकर यांनी मनोगतात कुटुंब व समाजाच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला यश मिळाले असल्याचे सांगितले. महिलांनी आरोग्य, आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर वाचन मंदिराच्या प्रथम सन्मानित महिला सौ. ललिता प्रभाकर तेली यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्त्री शक्ती ही समाजाची मोठी ताकद असून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष बावली नाईक, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गावडे, चंद्रकांत जाधव, डॉ. मिलिंद खानोलकर, निखिल कासारलकर तसेच कर्मचारीवर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. स्नेहा खानोलकर यांनी केले.



