पालघर : आजच्या काळात वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि पर्यावरणातील असमतोल ही गंभीर समस्या बनली आहे. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्येला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने इको गुडी हा उपक्रम राबवला. हा उपक्रम १६ मार्च २०२६ रोजी, जिल्हा परिषद शाळा कोसबाड केंद्र नांदगाव, पालघर येथे आयोजित करण्यात आला.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने गुढी साजरी करण्याऐवजी पर्यावरणपूरक इको गुडी साजरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसोबत सीड बॉल्स बनवण्याची कृती घेण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच सीड बॉल तयार केले. विद्यार्थ्यांना हे सीड बॉल्स मोकळ्या, हवेशीर आणि पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी ठेवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच शाळेच्या परिसरात २० विद्यार्थ्यांसह रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्या रोपांना स्वतःच्या आवडीची नावे दिली आणि ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेतली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण झाली. लहान वयातच झाडे लावणे व त्यांची काळजी घेण्याची सवय लागेल. त्यामुळे भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर, शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच कोकण संस्थेचे कार्यकर्ते सुहास खामकर, श्वेता रहाटे, सुनिता मर्चंडे आणि राज घोलप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

भविष्यात अधिक शाळांमध्ये इको गुडी व इतर पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. तसेच विद्यार्थ्यांना ‘एक विद्यार्थी – एक झाड’ या संकल्पनेत सहभागी करून दीर्घकालीन पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.



