सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन, सावंतवाडी तसेच सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यसैनिक के. जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२६’ चे आयोजन ७ ते ११ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे होणार आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन आज मंगळवार (दि. ७) रोजी सायंकाळी ६ वाजता मा. सुरेश शिपूरकर (कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. रुपेश पाटकर (बांदा) उपस्थित राहणार आहेत.
या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ‘कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार’ डॉ. महेंद्र मोहन (ओणी-राजापूर) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘प्राचार्य अल्ताफ खान उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ श्री. मधुकर मातोंडकर (सावंतवाडी), ‘प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार’ श्री. जयंत बरेगार (सावंतवाडी) तसेच ‘प्रा. मिलिंद भोसले स्मृती मित्रार्थी ग्रंथालय वाचक पुरस्कार’ सौ. राजश्री टिपणीस (सावंतवाडी) यांचा समावेश आहे.
व्याख्यानमालेअंतर्गत विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बुधवारी (दि. ८) डॉ. मेधा पुरव सामंत (पुणे) या ‘महिला सक्षमीकरणाची पन्नास वर्षे’ या विषयावर व्याख्यान देतील. गुरुवारी (दि. ९) सुभाष वारे (पुणे) हे ‘संविधान : आपल्या जगण्याचा आधार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवारी (दि. १०) डॉ. व्ही. एन. शिंदे (कोल्हापूर) हे ‘जंगलप्रदूषण मानवाला संपवेल’ या विषयावर भाष्य करणार असून, शनिवारी (दि. ११) मा. आनंद शितोळे (अहिल्यानगर) हे ‘आमच्या हातावर आमचेच डोके’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
या व्याख्यानमालेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



