सिंधुदुर्गात आत्महत्यांची मालिका थांबणार कधी? ; वेंगुर्ला तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

सावंतवाडी/वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन आणि तरुणांमध्ये आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असतानाच आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे येथे काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास २३ वर्षीय ॲन्थोनी या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एका तरुणाच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला, स्वप्नांनी भरलेला हा तरुण अचानक अशा टोकाच्या निर्णयाकडे का वळला, याबाबत गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते. सध्या त्याचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, पुढील वैद्यकीय व पोलिस प्रक्रिया सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात विशेषतः लहान मुले आणि तरुणांमध्ये वाढलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी समाजमन हादरले आहे. तणाव, मानसिक दबाव, अपेक्षांचे ओझे की इतर काही कारणे — याचा शोध घेणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन तरुणांशी संवाद वाढवणे, त्यांना मानसिक आधार देणे ही काळाची गरज आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे.  आपण आपल्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने समजून घेत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles