नवी दिल्ली : घरातील कामासाठी ठेवलेले मदतनीस हे अनेक कुटुंबांच्या आयुष्याचा आधार बनले आहेत. पण कधी कधी हाच विश्वास जीवघेणा ठरतो, याची अंगावर काटा आणणारी घटना राजधानी दिल्लीत समोर आली आहे. एका आयआरएस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या २२ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला, आणि या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात घडलेल्या या भयानक प्रकारात, घरात पूर्वी काम करणाऱ्या राहुल मीना या माजी नोकरानेच सूड आणि लोभाच्या भरात घरात घुसून तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर चार्जरच्या केबलने गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने घरातील सुमारे अडीच लाख रुपये लंपास करत फरार झाला.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी राहुल तब्बल वर्षभर त्या अधिकाऱ्याच्या घरी राहत होता. त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट—चाव्या कुठे ठेवतात, कुटुंबीयांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, घर कधी रिकामं असतं—याची त्याला पूर्ण माहिती होती. दोन महिन्यांपूर्वी गैरव्यवहार आणि पैशांची अफरातफर केल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही कुटुंबाने कोणतीही खबरदारी घेतली नाही, हीच सर्वात मोठी चूक ठरली.
चावीची जागा बदलली नाही, आणि घडला अनर्थ!
राहुलला चाव्या नेमक्या कुठे ठेवलेल्या आहेत, हे ठाऊक होतं. बुधवारी सकाळी त्याने शू रॅकमध्ये ठेवलेली चावी घेत घरात प्रवेश केला. त्या वेळी तरुणी घरात एकटीच होती… आणि पुढे घडलेलं अत्यंत संतापजनक व हृदयद्रावक आहे.
व्यसन, कर्ज आणि गुन्हेगारीचा मार्ग –
तपासात समोर आले की, राहुलला ऑनलाइन लुडोच्या जुगाराचे व्यसन लागले होते. पैशांची गरज, कर्जाचा दबाव आणि वैयक्तिक वाद यामुळे त्याने चोरीच्या उद्देशाने हा कट रचला असावा. पण चोरीचा हेतू पुढे जाऊन थेट बलात्कार आणि खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात बदलला.
ओळखीचा गैरफायदा –
राहुलच्या वडिलांची ओळख असल्यामुळेच त्याला या घरात नोकरी मिळाली होती. मात्र, हाच विश्वास कुटुंबासाठी घातक ठरला.
सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेतून शिकवण आणि इशारा –
ही घटना प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे. घरात कोणालाही कामावर ठेवताना पूर्ण पडताळणी करा, आणि कोणतीही शंका असल्यास त्वरित सुरक्षा उपाययोजना करा. थोडीशी निष्काळजीपणा आयुष्यभराचा पश्चात्ताप ठरू शकतो.
पोलिसांकडून तपास सुरू-
हा गुन्हा केल्यानंतर आरोपी राहुल हा दिल्लीतील टॅक्सी चालक असलेल्या त्याच्या काकांकडे गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे. सध्या या बाजूनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, राहुल मीनाला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीची चौकशी सुरू असून प्रकरणाच्या इतर पैलूंचाही सखोल तपास केला जात आहे. भविष्यात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे, असं दिल्ली पोलिसांचे म्हणणं आहे.



