गुणवंतांचा तुफानी जल्लोष! ; विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न. 

कुडाळ : सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा पावशी (ता. कुडाळ) येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. इयत्ता ५वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२५-२६ मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल यांच्या हस्ते झाले. “विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचे विद्यार्थ्यांप्रति कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.


या सोहळ्यात ६० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख पारितोषिक आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले. विशेष प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचाही संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक किरण चौगुले, मच्छिमार संघटनेचे नेते वसंत तांडेल, तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात कुडाळ कुंभारवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करून वातावरण भारावून टाकले. सराव परीक्षा प्रमुख रामचंद्र झोरे व केंद्रसंचालकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच संस्थेच्या सदस्या शितल गोसावी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ तसेच गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. किरण चौगुले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, चिकाटी आणि सातत्याचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “अशा उपक्रमांना समाजाचा पाठिंबा आवश्यक आहे,” असे मत प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कर्पे व निशा जाधव यांनी केले. प्रास्ताविक रविंद्रनाथ गोसावी यांनी केले, स्वागत एकनाथ जानकर यांनी केले, तर आभार दत्तगुरू कांबळी यांनी मानले.
या सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला असून, जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष कर्पुरगौर जाधव यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles