सिंधुदुर्ग : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीची तयारी वेगात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतींमध्ये १२ थेट सरपंच व १४३ सदस्य पदांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली असून, अंतिम टप्प्यात १४ ग्रामपंचायतींमध्ये २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ते १३ एप्रिल दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. थेट सरपंच पदासाठी २०, तर सदस्य पदासाठी १४३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सदस्य पदाचे २ अर्ज अपात्र ठरले. तसेच सरपंच पदासाठी ५ आणि सदस्य पदासाठी १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
अंतिम चित्रानुसार, जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदासाठी ११ उमेदवार रिंगणात असून ९ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी २३ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
🏡 थेट सरपंच पदासाठी निवडणूक –
कणकवली – घोणसरी
मालवण – सुकळवाड, चौके
कुडाळ – कालेली
सावंतवाडी – माजगाव
🧾 सदस्य पदासाठी पोटनिवडणूक
कणकवली – दारिस्ते, तळेरे
मालवण – धामापूर, वराड
कुडाळ – गावराई, चेंदवण, रानबुंबळी
वेंगुर्ला – मठ
सावंतवाडी – नाणोस
या निवडणुकीत एकूण १४,२१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी आहे.
दरम्यान, लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



