सावंतवाडी : येथील सर्वोदय नगर येथे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री घडलेल्या मारामारी व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपीला सापळा रचून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी पुणे येथील शौनक सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कारिवडेकर व इतर पाच जणांविरुद्ध गाडी अंगावर घालून खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तहसील राजगुरू, तल्ला राजगुरू (रा. बांदा) व नितीन मेस्त्री (रा. कोलगाव) यांसह इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी सागर कारिवडेकर हा तेव्हापासून फरार होता.
दरम्यान, तो आपल्या सासरवाडी कारिवडे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव, महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार आज (दि. २६ एप्रिल २०२६) सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास कारिवडे परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे, सागर कारिवडेकर याच्यावर ठाणे व मुंबई येथे आर्थिक व्यवहारासंबंधित गुन्हेही दाखल आहेत. तसेच गुंतवणूकदार सपकाळ, देवकाते आदींवर आपल्या साथीदारांकडून हल्ला केल्याच्या गंभीर आरोपांमध्येही तो वॉन्टेड होता.
या अटकेमुळे या प्रकरणाला मोठी गती मिळाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व जयेश खंदरकर करीत आहेत.



