पत्नीच्या विरहातून तरुणाची दरीत उडी? ; आंबोली घाटात युवकाचा मृतदेह आढळला.

सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली गावठाणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुरतडकर (वय २९) याचा मृतदेह आंबोली मुख्य धबधबा परिसरातील खोल दरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्येची घटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
राजाराम याचे पाच वर्षांपूर्वी सांगेली येथील एका युवतीशी विवाह झाला होता. मात्र राजाराम दारूचे व्यसन करत असल्याच्या कारणावरून विवाहानंतर सुमारे वर्षभरातच पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर ती पुन्हा सासरी परतली नव्हती. दोघांमधील वाद प्रकरण न्यायालयात सुरू असून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पत्नीचे दुसरीकडे लग्न ठरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजाराम हा सोमवारी (दि. ११ मे २०२६) सांगेली येथे गेला होता. मात्र संबंधित युवतीने भेटण्यास नकार दिल्यानंतर तो आपल्या दुचाकीवरून परत आंबोलीकडे निघाला. मात्र तो घरी पोहोचलाच नाही.


मंगळवारी सकाळी आंबोली मुख्य धबधब्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर त्याची मोटारसायकल उभी असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मोटारसायकलला चावी असल्याने ओळखीच्या व्यक्तींनी ती घरी आणून दिली. मात्र राजाराम घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली.
यानंतर सह्याद्री अॅडव्हेंचर्स अँड रेस्क्यू टीमच्या मदतीने घटनास्थळी शोधमोहीम राबविण्यात आली. ड्रोन व कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेत असताना सुमारे २५० ते ३०० फूट खोल दरीत राजाराम याचा मृतदेह आढळून आला. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह दरीतून बाहेर काढला.
या प्रकरणी आत्महत्येसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया आंबोली पोलीस दूरक्षेत्रात सुरू असून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आंबोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles