कुडाळ : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील युवक-युवतींसाठी बँकिंग क्षेत्रातील भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक ३० मे २०२६ रोजी मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल, पेट्रोल पंप नजीक येथे करण्यात आले आहे. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रोजगार मेळाव्याच्या नियोजनासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी कुडाळ येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालय, पेडणेकर हॉल, रेल्वे स्टेशन रोड येथे संपन्न झाली. जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात नामांकित AXIS BANK, HDFC BANK आणि ICICI BANK या बँकांचा सहभाग असणार असून Assistant Manager पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी तात्काळ निकाल आणि ऑफर लेटर देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवार पात्र असणार आहेत. फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली असून अद्ययावत बायोडाटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
याचबरोबर १०वी आणि १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकासावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील तरुणांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
बैठकीदरम्यान नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले श्री. रुपेश अशोक पावसकर यांचा जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. समिल जळवी, माजी अध्यक्ष तथा जिल्हा सदस्य श्री. रमण वायंगणकर, जिल्हा सदस्य श्री. रुपेश पावसकर, जिल्हा सदस्य सहसचिव श्री. प्रियदर्शन कुडव, जिल्हा सदस्य विकास वैद्य, श्री. निलेश गोवेकर, श्री. लक्ष्मीकांत मुंडिये, श्री. भरत आवळे, श्री. श्रीकांत वेंगुर्लेकर, श्री. प्रवीण आचरेकर, श्री. चंदन पांगे, श्री. गजानन वेंगुर्लेकर यांच्यासह अनेक भंडारी समाज बांधव उपस्थित होते.

भंडारी समाजातील युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
- श्री. हेमंत करंगुटकर – ९४२३५१३६४७
- श्री. रमण वायंगणकर – ९६२३७२७९२०
- श्री. समिल जळवी – ९४२१२३५५०८
- श्री. राजू गवंडे – ९०६७४७४८९९
- श्री. प्रियदर्शन कुडव – ९४२३३५२६२६



