सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेचा ध्यास घेत जगलेल्या निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, पत्नीच्या निधनाचा आघात ताजा असतानाच अवघ्या महिनाभरातच पतीनेही अखेरचा निरोप घेतल्याने पवार कुटुंबावर दु:खाचा दुहेरी आघात झाला आहे.
देशासाठी रणांगणावर लढणारा सैनिक अखेर आयुष्याच्या लढाईत शांत झाला… आणि एका महिन्यापूर्वी संसाराची साथ सोडून गेलेल्या पत्नीच्या विरहात जगणाऱ्या त्या सैनिकानेही अखेर आपल्या जीवनप्रवासाला पूर्णविराम दिला. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ते ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार तसेच इंजिनिअर जयराम (बाळा) पवार यांचे वडील होत.
भारतीय सैन्यदलाच्या ‘एएससी’ विभागात हवालदार पदावर तब्बल ३२ वर्षे सेवा बजावताना त्यांनी १९७१ च्या ऐतिहासिक भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. देशसेवा हेच जीवनाचे सर्वोच्च कर्तव्य मानणाऱ्या पवार यांना सैन्यदलाचा प्रचंड अभिमान होता. सैनिकी शिस्त, कर्तव्यदक्षता आणि राष्ट्रप्रेम त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत असे.
सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची सेवावृत्ती थांबली नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात एसटी चालक म्हणून त्यांनी आणखी १५ वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले डेपोमध्ये त्यांनी जबाबदारीने काम करत प्रवाशांचा विश्वास संपादन केला होता.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी सैनिकी गणवेश परिधान करून ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. चकाकणारे शूज, पॉलिश केलेला बेल्ट, कडक इस्त्रीचा गणवेश आणि ताठ मानेने ध्वजाला दिलेला सॅल्यूट — त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सैनिक शेवटपर्यंत जिवंत असल्याची साक्ष देत असे.
गावाच्या विकासासाठीही ते तेवढ्याच आस्थेने झटले. सार्वजनिक रस्त्याच्या कामासाठी उपोषण आंदोलनाची तयारी दाखवणारा हा सैनिक समाजहितासाठी सदैव पुढे राहिला.
पत्नीच्या निधनानंतर ते आतून खचले होते, असे जवळच्या नातेवाईकांनी सांगितले. आयुष्यभराची सोबत हरपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील शांततेत एक वेदना दडलेली दिसत होती. आणि अखेर अवघ्या एका महिन्यातच त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याने अनेकांचे डोळे पाणावले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. चंद्रकांत पवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सातार्डा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार असून सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



