सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक व मार्कशीटची प्रत ८४८४८२७९९३ किंवा ७९७२६४८७८१ या मोबाईल क्रमांकांवर पाठवून नावनोंदणी करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येत आहे. यासोबतच शिक्षणाची जिद्द असलेल्या आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा उपक्रमही राबविला जात असून, दरवर्षी १० गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सत्कार समारंभाची तारीख व स्थळ नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.



