पोलीस यंत्रणा कोणाच्या आशीर्वादावर? ; आमदार निलेश राणेंच्या पोस्टने सिंधुदुर्गात खळबळ. ; उपरकरांच्या आरोपांनंतर आता सत्ताधारी आमदारांचाही थेट हल्लाबोल, अवैध धंद्यांना पोलीस संरक्षणाचा संशय अधिक गडद.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता हा मुद्दा थेट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात पोलीस यंत्रणेच्या ‘आशीर्वादाने’ मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांची माहितीही त्यांनी उघडपणे दिली होती. मात्र या आरोपांनंतरही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उलट संशय अधिकच बळावला.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या सूचक पण थेट पोस्टनंतर या प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारानेच जिल्हा पोलीस अधीक्षकांवर थेट निशाणा साधल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. “जर सत्तेतील आमदारालाच पोलीस प्रशासनावर सार्वजनिकपणे सवाल उपस्थित करावे लागत असतील, तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल आता नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे — जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमागे नेमके कोणाचे संरक्षण आहे? पोलीस यंत्रणा खरोखरच कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे की जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे? उपरकरांच्या आरोपांनंतर आता आमदार निलेश राणेंच्या भूमिकेमुळे या चर्चांना अधिक धार मिळाली आहे.
आता निलेश राणे पत्रकार परिषद घेऊन आणखी कोणते गौप्यस्फोट करणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासन आणि अवैध धंद्यांमधील कथित संबंधांबाबत काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles