धुळे : धुळे जिल्हा ज्युदो अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीत आणखी एका सुवर्णपानाची भर पडली असून, चंदीगड येथे सुरू असलेल्या नॅशनल कॅडेट ज्युदो स्पर्धेत धुळेचा गुणवान ज्यूदोपटू हिमांशू पगारे (साई पगारे) याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या नेत्रदीपक यशामुळे महाराष्ट्र संघालाही सुवर्णपदकाचा बहुमान प्राप्त झाला असून संपूर्ण राज्याचा अभिमान उंचावला आहे.
यशाच्या या सुवर्ण झेपेसोबतच हिमांशूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आगामी काळात जॉर्डन येथे होणाऱ्या आशियाई कॅडेट ज्युदो स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकविण्यास सज्ज झाला आहे.
हिमांशूने मिळवलेले हे यश केवळ एका खेळाडूचे यश नसून त्यामागे त्याची अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि घामाचे अनमोल थेंब दडलेले आहेत. त्याचबरोबर त्याला घडविण्यासाठी अविरत परिश्रम घेणारे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि मध्यवर्ती ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ खेळाडू यांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे. त्यांच्या समर्पणामुळेच आज धुळेच्या मातीतून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडत असल्याचे चित्र दिसत आहे.
हिमांशूच्या कर्तृत्वाने संपूर्ण धुळे जिल्ह्याचा ऊर अभिमानाने भरून आला असून, भविष्यात तो यशाची अशीच एकापाठोपाठ एक शिखरे सर करत हिमालयाएवढी उंच भरारी घेईल, याबाबत क्रीडाप्रेमींना आणि प्रशिक्षकांना पूर्ण विश्वास आहे.
हिमांशू पगारे, धुळे जिल्हा ज्युदो अकॅडमी, मध्यवर्ती ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील सर्व वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे.



