शिवणयंत्रांच्या घरघराटातून स्वावलंबनाचा नवा सूर! ; १७ महिलांच्या हाती आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली! ; महिला सक्षमीकरणाला कोकण कला व शिक्षण विकास संस्थेची भक्कम साथ, ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने नवी उभारी!

कुडाळ :  ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मोफत शिवणयंत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १७ गरजू, होतकरू व जिद्दी महिलांच्या हाती शिवणयंत्रांची भेट देत त्यांच्या स्वावलंबी भविष्यासाठी नवी दारे खुली करण्यात आली.
महिलांच्या हातात शिवणयंत्र देणे म्हणजे केवळ एक साधन देणे नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना पंख देणे आणि आत्मविश्वासाची नवी उमेद जागवणे होय. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिवणयंत्रांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगार निर्माण करण्याची, स्वतःचे उत्पन्न मिळविण्याची आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे आयोजित कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल, रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अमोल गुराम, सुरज कदम, साक्षी पोटे, प्रीती पांगे, हर्षला कोल्हे यांच्यासह संस्था पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिवणयंत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना, “कौशल्य हेच खरे भांडवल असून त्याच्या जोरावर महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत महत्त्वाची भूमिका बजावावी,” असे आवाहन केले.
‘कोकण शिलाई स्कूल’ ठरत आहेत महिला सक्षमीकरणाची विद्यापीठे
विशेष बाब म्हणजे, संस्थेच्या माध्यमातून सध्या कोकणातील विविध भागांमध्ये १९ ‘कोकण शिलाई स्कूल’ यशस्वीपणे कार्यरत असून या प्रशिक्षण केंद्रांमधून अनेक महिलांनी शिवणकलेचे प्रशिक्षण घेऊन रोजगार आणि उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. शिवणयंत्र प्राप्त झालेल्या महिलांनाही या उपक्रमाशी जोडून त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी आणि भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीत अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढल्यास ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि परिवर्तनाची जाणीव करून देणारा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरी आडेलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैष्णवी म्हाडगुत, ऋचा पेडणेकर, हर्षदा कोरगावकर, तन्वी, अवंती गवस तसेच सर्व सहकारी, स्वयंसेवक आणि समर्थकांनी मोलाचे योगदान दिले.
महिलांच्या हातातील शिवणयंत्र हे आता केवळ रोजगाराचे साधन नसून, त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारे परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles