सावंतवाडी : जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी नगरपालिकेवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोपांना ठामपणे उत्तर दिले आहे. “एक जागा मागून प्रत्यक्षात तीन जागांचा वापर करण्यात आला असून केवळ १५ दिवसांचे भाडे भरून दीड महिना जागा वापरण्यात आली,” असा दावा त्यांनी केला.
नगराध्यक्षा सौ .भोंसले म्हणाल्या की, संबंधित इमारत ही सांस्कृतिक व ऐतिहासिक संग्रहालयासाठी आरक्षित असून मायकल डिसोजा यांनी एका रूमची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी दोन अतिरिक्त रूमचा वापर केला. त्यामध्ये जेवणाच्या व्यवस्थेसाठीही स्वतंत्र जागा वापरण्यात आल्याचे पाहणीतून समोर आले आहे.
“एक लाख पन्नास हजार रुपये भाडे मागितल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी केवळ ५० हजार रुपये भरले आहेत. तसेच १५ दिवसांसाठी परवानगी घेऊन दीड महिन्यापर्यंत जागेचा वापर सुरू ठेवला गेला. अतिरिक्त रूम वापरायच्या असतील तर त्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र ती घेण्यात आली नाही,” असे भोसले यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाला जागा देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. “मी नगराध्यक्षा होण्यापूर्वीच ती जागा देण्यात आली होती. त्यामुळे त्याची तुलना सध्याच्या प्रकरणाशी होऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, “बाथरूम वापरण्याबाबत आपण कोणतेही वक्तव्य केलेले नाही. इतर आरोपांबाबतही योग्य वेळी सविस्तर भूमिका मांडणार आहोत,” असे सांगत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी डिसोजा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
एकूणच, जागेच्या वापराबाबतचा वाद आता अधिकच तापला असून नगरपालिकेच्या नियमांचे पालन झाले की नाही?, यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


