राजघराण्यावर टीका खपवून घेणार नाही!, …अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार!” मायकल डिसोजांच्या आरोपांवर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचा जोरदार पलटवार! ; ‘खासगी कंपनीला नियमाप्रमाणेच भाडे आकारले’

सावंतवाडी : ग्रो-बीग टेक्नॉलॉजी ही कोणतीही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या नियमांनुसारच त्यांच्याकडून भाडे आकारण्यात आले आहे. त्यांनी केवळ १५ दिवसांचे भाडे भरले असताना तब्बल दीड महिना जागेचा वापर केला असून एका खोलीची परवानगी घेऊन तीन खोल्यांचा वापर केला जात आहे. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही काम करत असताना माझ्यावर टीका करण्याऐवजी मायकल डिसोजा यांनी थेट राजघराण्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अजिबात योग्य नसून त्याबाबत मानहानीचा दावा दाखल करण्याचाही आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत, असा इशारा नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी दिला.

सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दीपाली भालेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.

श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या की, नगरपरिषदेच्या जिमखाना इमारतीत ग्रो-बीग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सेंटर सुरू करण्यात आले होते. ही जागा सांस्कृतिक व वस्तुसंग्रहालयासाठी महत्त्वाची असल्याने तेथील कामकाजाची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो असता काही बाबी निदर्शनास आल्या. संबंधित कंपनीला १५ दिवसांसाठी ५० हजार रुपये भाडे आणि ९ हजार रुपये जीएसटी आकारून एक खोली देण्यात आली होती. मात्र आज दीड महिना उलटूनही कंपनी तेथे कार्यरत आहे. शिवाय एका खोलीची परवानगी घेऊन तीन खोल्यांचा वापर करण्यात आला असल्याचे आढळले.

“याबाबत विचारणा केल्यावर चुकीची माहिती देण्यात आली. नगरपरिषदेच्या मालमत्तेचा वापर नेमका कशासाठी होतो यावर लक्ष ठेवणे ही नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. नियमांबाबत प्रश्न उपस्थित केला म्हणून राजघराण्यावर टीका करणे आणि कुटुंबीयांवर आरोप करणे योग्य नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे म्हणाल्या की, “मी राजकारणात लोकांची कामे करण्यासाठी आणि सावंतवाडीच्या विकासासाठी आले आहे. कोणावरही वैयक्तिक टीका करणे हा आमचा स्वभाव नाही. मात्र नगरपरिषदेच्या मालमत्तेचा गैरवापर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. ग्रो-बीग टेक्नॉलॉजी ही खासगी कंपनी असल्यामुळेच त्यांच्याकडून भाडे आकारण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी हाच आमचा उद्देश आहे.”

यावेळी त्यांनी आरोप करणाऱ्यांना खुलं आव्हान देत, “आमच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्याचे पुरावे जनतेसमोर आणावेत,” असेही सांगितले.

दरम्यान, शहरातील विकासकामांमध्ये काही अडचणी येत असल्या तरी नगरपरिषदेची संपूर्ण टीम नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मल्टिस्पेशालिटी प्रकल्पासंदर्भातही अनेक बैठका झाल्या असून राजघराण्याने विविध विकासकामांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

“माझ्यावर टीका करा, पण राजघराण्याला लक्ष्य करू नका!”

राजकीय टीका माझ्यावर करा, मात्र त्यासाठी राजघराणे आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य करणे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे आवश्यक असल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याची भूमिका आम्ही घेऊ, असा स्पष्ट इशाराच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles