सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात सोमवारी रात्री एक आगळे वेगळे पण तेवढेच मनाला आनंद देणारे दृश्य पाहायला मिळाले. आजगाव परिसरात एका खाजगी कंपनीद्वारा होत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाचा विरोध करण्यासाठी ग्रामस्थ वेतोबा मंदिरात जमले होते. यावेळी येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच ठाकरेंच्या शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ हे देखील दाखल झाले. त्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांच्या भावना दोन्हीही नेत्यांनी जाणून घेतल्या. याच दरम्यान ऐरवी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करणारे हे दोन्हीही शिवसेनेचे वाघ देवळात एकत्र येऊन कोकणच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा करताना पाहावयास मिळाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतात की काय?, कारण संजू परब यांनी रूपेश राऊळ यांच्या कानात जाऊन नेमके काय सांगितले? यावरही उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली. मात्र श्री देव वेतोबाच्या आशीर्वादाने कोकणच्या भल्यासाठी राजकीय शत्रुत्व विसरून विधायक कार्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे.



