– सावंतवाडी-कुडाळ वनविभागाची संयुक्त धडक कारवाई; वन्यजीव तस्करीच्या रॅकेटचा तपास सुरू.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, बिबट्याच्या नखांची बेकायदेशीर तस्करी केल्याप्रकरणी कुडाळ येथील एका सुवर्णकाराला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. सावंतवाडी आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या ही धडक कारवाई करत संशयिताच्या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत संशयिताकडून बिबट्याची सहा नखे, दोन सुळे, सहा इतर प्राण्यांची नखे तसेच विविध वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याचे नेमके स्वरूप तपासले जाणार आहे.
वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान अजित मसुरकर (रा. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरोधात संबंधित वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणामागे वन्यजीवांच्या अवयवांची मोठी तस्करी करणारे रॅकेट कार्यरत आहे का? जप्त करण्यात आलेले साहित्य कुठून आणले गेले आणि ते कोणाला विकले जाणार होते? याचा वनविभागाकडून सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी – दिनांक 30.06.2026 रोजी वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि. सावंतवाडी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि. सावंतवाडी तसेच त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तसेच त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी असे मिळून आरोपीत अजित वसंत मसुरकर, यांचे मौजे कुडाळ बाजारपेठ येथील मसुरकर जेम्स या दुकानाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता सदर दुकानाच्या झडतीमध्ये वन्यप्राणी बिबट नखे 06 नग (अनुसुची।) वन्यप्राण्यांच्या शिंगापासून तयार केलेली नखे नग 06 वन्यप्राणी बिबट नखांचे अवयव नग 20 वन्यप्राणी बिबटचे दात सुळे नग 02 असा एकुण 112000/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनुसुची 1 अन्वये संरक्षण प्राप्त वन्यप्राणी बिबटची शिकार करुन त्यापासून मृगयाचिन्हे तयार करुन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशिररित्या बाळगल्याने जप्त करुन ताब्यात घेतला. या प्रकरणी वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि. सावंतवाडी यांनी आपले कडील प्र.गु.रि. 07/2026 दि. 30.06.2026 चा गुन्हा नोंद केला. सदर वन्यप्राणी बिबट नखे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचा गुन्हा मान्य केल्याने आरोपीस अटक करुन मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास 02 दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी आणि संजय वाघमोडे, विभागीय वनअधिकारी, दक्षता कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुनिल लाड यांच्या नेत्वृत्वाखाली सचिन शिडतुरे, वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि. सावंतवाडी, चेतन पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ, महेश पाटील वनपाल संवअनि, गौरेश राणे, पोह संवअनि, सदानंद परब, वनपाल मालवण, सुर्यकांत सावंत वनपाल नेरुर, समीर खरवत, वनरक्षक नेरुर, रविंद्र पाटील, वनरक्षक संवअनि, श्रीम. रिषीका होले, वनरक्षक संवअनि प्रसाद पाटील वनरक्षक, राहूल मयेकर चालक, नितीन सावंत, चालक यांनी पार पाडली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपन्न असून तेथे विविध वन्यजीवांचा अधिवास आहे. बिबट, रानगवा, सांबर, खवलेमांजर, पिसोरी असे प्राणी जीवचक्रातील महत्वाचे घटक असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात. सदर वन्यप्राणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये संरक्षीत असून सदर वन्यप्राण्यांची शिकार करणे त्यांच्या अधिवासास धोका पोहचवणे, बेकायेदशिरपणे ताब्यात ठेवणे, वन्यप्राण्यांचे अवयव मृगयाचिन्हे बाळगणे अथवा त्यांचा व्यापार करणे आदी कृतीस कायदयाने प्रतिबंधीत केलेल्या असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यास 07 वर्षा पर्यंत कारावास अधिक द्रव्यदंडाची तरतुद करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बेकायदेशिर कृत्य आढळून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा. माहिती देण्याऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन, श्री मिलीश शर्मा (IFS) उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांनी केले आहे.



