किक बॉक्सिंग, कराटे आणि बॉक्सिंगमध्ये प्रेरणा भोसलेची राज्यस्तरापर्यंत सुवर्ण कामगिरी! ; नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार
सावंतवाडी : किक बॉक्सिंग, कराटे आणि बॉक्सिंग या तिन्ही क्रीडा प्रकारांत विभागीय, जिल्हा आणि राज्यस्तरावर दमदार कामगिरी करत सुवर्णपदकांची ‘हॅट्ट्रिक’ करणाऱ्या बांदा येथील उदयोन्मुख खेळाडू प्रेरणा भोसले हिचा सकल मराठा समाज, सिंधुदुर्गच्या वतीने विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला. तिच्या या अभिमानास्पद यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते प्रेरणा भोसले हिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तिच्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण यशाचे उपस्थित मान्यवरांनी मुक्तकंठाने कौतुक करत भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही ती सुवर्ण यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
या भव्य सोहळ्यास आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शंकर घारे, विक्रांत सावंत, जितेंद्र गावकर, दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, संदीप कुडतरकर, विलास जाधव, राघोजी सावंत, हरी वारंग यांच्यासह मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मराठा समाजातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. जिल्हाभरातून विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



