- सेंद्रिय शेतीतून विक्रमी भात उत्पादन. ; सावंतवाडी तालुक्यात तृतीय क्रमांक, कृषी विभागाकडून सन्मान!
सावंतवाडी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती सावंतवाडी आणि ग्रामपंचायत बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नेमळे येथील प्रगतशील शेतकरी देवू बाळा राऊळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भात पीक स्पर्धा सन २०२५-२६ मध्ये प्रति गुंठा ९१.६६ किलो इतके विक्रमी भात उत्पादन घेत सावंतवाडी तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. पंचायत समिती, सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. देवू राऊळ यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव देवदास देवू राऊळ यांनी सन्मान स्वीकारला.
गतवर्षी ‘पंकज’ या भात वाणाचा वापर करून तसेच पूर्णतः सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत देवू राऊळ यांनी भरघोस भात उत्पादन घेत आदर्श शेतीचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण परिश्रम, आधुनिक शेतीची जोड आणि कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये देवू राऊळ यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल देवू बाळा राऊळ, त्यांना शेतीमध्ये खंबीर साथ देणारे त्यांच्या कुटुंबीय, तसेच नेमळे ग्रामपंचायत, परिसरातील शेतकरी आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.



