सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये चौकुळ इंग्लिश स्कूल, चौकुळच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेसाठी शाळेतील एकूण आठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष म्हणजे तिन्ही विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त करण्याचा मान मिळविला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनुजा अर्जुन परब, तेजल भिवा गावडे आणि संतोष लक्ष्मण पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामुळे शाळा, पालक आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल विद्यार्थी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संस्थाध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, सचिव व्ही. बी. नाईक, शाळा समितीचे अध्यक्ष बागवे सर, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. दळवी मॅडम, मार्गदर्शक राऊळ मॅडम, कांबळे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी रूपेश मोरजकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश संपादन केले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



