सावंतवाडी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या पखवाज परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांनी प्रथम व द्वितीय श्रेणीत यश मिळविले.
या परीक्षेत इयत्ता चौथीतील अभिनव गावस याने प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच श्रीपाद पावसकर आणि सोहम हडफडकर यांनी द्वितीय श्रेणी मिळविली. इयत्ता सहावीतील उगम वेर्लेकर यानेही द्वितीय श्रेणीसह यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे पखवाज शिक्षक संकेत म्हापणकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व मेहनत मोलाची ठरली. त्यांच्या प्रभावी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवून शाळेची मान उंचावली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक संकेत म्हापणकर यांचे प्रशालेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर आणि मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक व कलाक्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



