टीकेकडे दुर्लक्ष करून सावंतवाडीच्या विकासावर लक्ष केंद्रित करा! : पालक मंत्री नितेश राणेंचा मौलिक सल्ला. ;जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देणार! : मंत्री नितेश राणे. ;

– ​नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन!

​सावंतवाडी  : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक सावंतवाडीचा स्पोर्ट जिमखाना अधिक सुसज्ज आणि दर्जेदार करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
​सावंतवाडी जिमखाना मैदानावर सावंतवाडी नगरपरिषद आयोजित स्व. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती जिल्हास्तरीय ‘नगराध्यक्षा चषक’ स्पर्धेनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. जागतिक बॅडमिंटन दिनानिमित्त आयोजित या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी त्यांनी स्वतः बॅडमिंटन खेळण्याचा आनंदही लुटला.

खेळातून एकजूट आणि कौशल्याचा बोध घ्या! – मंत्री नितेश राणे.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि खेळाडूंना संबोधित करताना ना. नितेश राणे म्हणाले, “आम्ही आमच्या तरुणपणी नेहमी मैदानावर असायचो. खेळ आपल्याला बरेच काही शिकवतो. बुद्धिबळातून जसे डोके चालवायचे कळते, तसेच संघभावनेतून एकजुटीने कसे जिंकायचे याचा बोध मिळतो. समाजात आणि राजकारणातही खेळाडूवृत्ती असणे आवश्यक आहे. जसे खेळाडू आपला संघ जिंकवण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच आपण सर्वांनी आपला जिल्हा आणि देश जिंकवण्यासाठी प्रयत्न केले, तर विकास अजिबात दूर नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक उत्तम खेळाडू आहेत. अशा स्पर्धांमधून संधी मिळाल्यास भविष्यात आपल्यातूनही विश्वनाथ आनंद किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन पटू निर्माण होऊन ते देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील. अशा गुणवंत खेळाडूंना पुढे जाण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.

धीरुभाई अंबानींच्या विचारांचा दाखला देत नगराध्यक्षांचे कौतुक!
नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोंसले यांच्या कामाचे विशेष कौतुक करत पालकमंत्री म्हणाले, आज समाजात पदावर बसलेल्या व्यक्तीचे कौतुक करण्याऐवजी केवळ टीका करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परंतु, धीरुभाई अंबानी यांनी म्हटले होते की, ‘तुम्ही यशस्वी होत आहात हे कशावरून समजायचे? जेव्हा तुमच्यावर सर्वाधिक टीका होते!’ त्यामुळे टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका. वाकड्या आणि आव्हानात्मक रस्त्यावर ड्रायव्हिंग करायलाच खरी मजा येते. नगराध्यक्षांनी क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेऊन उत्तम काम केले आहे, पालकमंत्री म्हणून मी आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, बॅडमिंटनसोबतच इतर सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
​ या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, नगर परिषद सभापती मोहिनी मडगांवकर, दिपाली भालेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, नंदू प्रभू देसाई, जोवेल डिसिल्व्हा यांच्यासह प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, नगर अभियंता तुषार सरडे तसेच पालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सहभागी खेळाडूंना आणि आयोजक टीमला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles