आठ दिवसांचा ‘अंधारराज’!, खांब उभा… पण वीज गायब! ; ”अधिकारी नेमके जागे होणार कधी?”- शिरशिंगेकरांचा महावितरणला संतप्त सवाल, आंदोलन उभारण्याचा ग्रामस्थांचा इशारा.

आशिष धोंड.

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिरशिंगे गावावर सध्या अक्षरशः ‘अंधाराचे संकट’ कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणच्या ढिसाळ आणि उदासीन कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनांची खैरात होत असून प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी जाधववाडी परिसरातील विजेचा खांब कोसळल्यानंतर तब्बल आठ दिवस प्रशासनाने ढिम्म हालचाल केली नाही. अखेर उशिरा खांब उभारण्यात आला; मात्र त्यानंतरही गेल्या दोन दिवसांपासून वीजच गायब असल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला आहे. “खांब उभा राहिला, पण वीज कधी येणार?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
सततच्या वीजखंडितीमुळे घरगुती कामे ठप्प झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही मोठा परिणाम होत आहे. रात्री अंधारात अभ्यास करावा कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाळ्यातील या परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण पंचक्रोशीची जबाबदारी केवळ एका वायरमनवर सोपविण्यात आल्याने तक्रारींचे वेळेत निवारण होत नाही. त्यामुळे शिरशिंगे व परिसरासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
“महावितरणचे अधिकारी अजून किती दिवस झोपेचे सोंग घेणार? नागरिकांना अंधारात ठेवून प्रशासनाची जबाबदारी संपते का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून शिरशिंगे व परिसरासाठी कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता महावितरण जागे होणार, की शिरशिंगेकरांना अंधारातच ठेवणार? हा प्रश्न संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles