सावंतवाडीतील आपत्ती व्यवस्थापन कोलमडले?, नागरिक रस्त्यावर, प्रशासन मात्र कागदावर! ; सरपंच सेवा तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांचे टिकास्त्र.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना सावंतवाडी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा गंभीर आरोप सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनी केला आहे.
मे महिन्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी त्या प्रशिक्षणाचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याचे त्यांनी म्हटले. तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळत आहेत, रस्त्यांवर पाणी साचले आहे, गटारे तुंबली आहेत, शाळांची छप्परे गळत आहेत, तर महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“अधिकारी वातानुकूलित गाड्यांत फिरतात, पण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढे येत नाहीत. आपत्ती व्यवस्थापन केवळ बैठका, कागदपत्रे आणि आदेशांपुरतेच मर्यादित राहिले आहे का?” असा सवालही पंडित यांनी उपस्थित केला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका त्यांनी केली.
“आज परिस्थिती अशी आहे की, पडलेली झाडे हटविण्यापासून ते रस्ते मोकळे करण्यापर्यंतची कामे नागरिकांनाच करावी लागत आहेत. प्रशासनाने तातडीने जबाबदारी स्वीकारून प्रभावी उपाययोजना कराव्यात. अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील,”मग आमच्या वर जनतेसाठी कितीही गुन्हे दाखल करा आम्ही ते घेऊ, असा इशाराही सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles