सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने “गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६” या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपरिषद सभागृहात करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, परिश्रम आणि उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा, १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या ४० हून अधिक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थी या भव्य सोहळ्यात गौरविले जाणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या गौरव सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणे, उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे आणि शिक्षण संस्था, पालक व समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.



