सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या संकुलातील गाळ्यांच्या भाडेपट्ट्यांबाबत कथित अनियमितता, थकीत भाडे, गाळ्यांचे परस्पर पोटभाडे तसेच भाडेपट्टा करारातील अटींचा भंग झाल्याच्या आरोपांवरून श्री. श्रेयस साईनाथ मुंज यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग, सावंतवाडी नगरपरिषद तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंज यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नगरपरिषदेच्या संकुलातील एका व्यक्तीने नऊपेक्षा अधिक गाळे अडवून ठेवल्याचा, भिंतीची तोडफोड केल्याचा तसेच सुमारे सहा वर्षांचे भाडे थकीत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित गाळे परस्पर पोटभाड्याने देऊन मूळ भाडेकरारातील अटींचा भंग झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, आपण नगरपरिषदेचे गाळे दरमहा ३० हजार रुपये भाड्याने घेण्यास तयार असल्याचे मुंज यांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र, विद्यमान गाळेधारकांकडून केवळ १२०० रुपयांची भाडेवाढ करून गाळेपट्टे करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, अशा परिस्थितीत पुनर्लिलावाची प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे.
मुंज यांनी नगरपरिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून कथितरीत्या पैसे स्वीकारल्याचे व्हिडिओ तसेच विकासकांसोबतच्या बैठका व पार्ट्यांचे फोटो-व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. हे पुरावे उपोषणाच्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच, संबंधित गाळेधारकांनी भाडेपट्ट्यातील अटी व तरतुदींचा भंग केल्याचे नगरपरिषदेने दिलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा मुंज यांनी केला आहे. त्यामुळे अशा गाळेपट्ट्यांचे नूतनीकरण करता येते का, याबाबत कायदेशीर तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्या तक्रारींवर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे सांगत मुंज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकाऱ्यांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही या आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री, पोलीस विभाग तसेच प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, निवेदनातील आरोपांबाबत सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधितांची बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.



