बांदा : घरबसल्या हस्तकलेच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण व्हावा आणि महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक दिशा मिळावी, या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत रोणापाल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील महिलांसाठी एकदिवसीय ‘पाईप क्लिनर प्रशिक्षणातून महिला सक्षमीकरण’ उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी गावडे, ग्रामसंघ अध्यक्षा सुहानी केणी, पोलिस पाटील निर्जरा परब, सीआरपी सृष्टी गाड, संस्थेच्या समन्वयक सानिका गावडे तसेच प्रशिक्षक सेजल गावडे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सानिका गावडे यांनी कोकण कला व शिक्षण विकास संस्था महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी तसेच कौशल्यविकासासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिलांनी पारंपरिक कौशल्याला आधुनिक बाजारपेठेची जोड देत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान पाईप क्लिनरच्या माध्यमातून जास्वंद, चाफा, मोदक, शो फ्लॉवर यांसह विविध आकर्षक आणि सजावटीच्या कलाकृती तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः कलाकृती तयार करण्याचा अनुभव घेतला.
या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या हस्तकला वस्तू तयार करून त्यांची विक्री करण्याची तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अल्प खर्चात उपलब्ध साहित्याचा वापर करून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
समारोपप्रसंगी नमिता शेगडे व सृष्टी गाड यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. महिलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देत स्वावलंबनाचा मार्ग खुला करणारा हा उपक्रम रोणापालमधील महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.



