सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली-सावरवाड-कुडतरकरटेंब येथे चोरट्या मार्गाने दारू विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध दारूसाठा बाळगणाऱ्या ५७ वर्षीय महिलेवर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली. वैशाली विजय कुडतरकर (वय ५७, रा. सांगेली-सावरवाड-कुडतरकरटेंब, ता. सावंतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री सुमारे ९.१३ वाजण्याच्या सुमारास सांगेली-सावरवाड-कुडतरकरटेंब परिसरात चोरट्या विक्रीच्या उद्देशाने अवैध दारूसाठा बाळगल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत सुमारे २ हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीला चाप बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार ऋतुजा राजेश परब यांच्या फिर्यादीवरून वैशाली कुडतरकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक ३२ नुसार रात्री १०.३० वाजता करण्यात आली. तसेच संशयित महिलेला बीएनएसएस कलम ३५(३) नुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
कारवाईची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. शिंदे करीत असून, दाखल अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार सौ. कदम काम पाहत आहेत.
चोरटी दारू विक्रीवर पोलिसांची नजर –
सांगेली परिसरात अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



