सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केसरी येथील पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेल्या ‘Amboli KSR Aquarium’ ला सदिच्छा भेट देत परिसराची पाहणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद राऊळ यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे मनःपूर्वक स्वागत व आदरातिथ्य केले. त्यांनी ‘Amboli KSR Aquarium’च्या संपूर्ण परिसराची माहिती देत येथील विविध आकर्षणे, उपक्रम तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करून दिली.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या केसरी परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी पोलीस निरीक्षक मगदूम यांनी माहिती घेतली. तसेच परिसराचा सर्वांगीण विकास, पर्यटनवाढ, पर्यटकांना सुरक्षित व आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
केसरी परिसरातील पर्यटनस्थळांना अधिक व्यापक प्रसिद्धी मिळाल्यास स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच या भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळू शकते, असा सूर यावेळी चर्चेत उमटला.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या या सदिच्छा भेटीमुळे ‘Amboli KSR Aquarium’च्या पर्यटनविषयक उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले असून, पोलिस प्रशासन आणि पर्यटन क्षेत्र यांच्यातील सकारात्मक संवादाची नवी दिशा निर्माण झाली आहे.



