मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर अनेक नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात तक्रार –
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नियक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून, अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती केली गेली आहे. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
तटकरे अद्याप पदावर कसे?
भाऊसाहेब गोरे यांनी या तक्रारीत तटकरे यांच्या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2026 मध्येच संपुष्टात आला असून कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच तकटरेंच्या जालना दौऱ्यात अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्याने तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकार्यांना पदावरून हटवल्याचाही आरोप यावेळी भाऊसाहेब गोरे यांनी केला आहे. त्यामुळे जालन्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.



