तिरंग्याच्या साक्षीने सावंतवाडीनगरी दुमदुमली!, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात निघाले न्हाऊन !; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या सूत्रबद्ध नियोजनाने ‘हर घर तिरंगा’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सावंतवाडी : हातात डौलाने फडकणारा तिरंगा… ओठांवर ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष… देशभक्तीने भारावलेले वातावरण आणि हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेले नागरिक… अशा अभूतपूर्व वातावरणात सावंतवाडी शहर आज अक्षरशः तिरंगामय झाले. भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ भव्य रॅलीला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रभक्तीचा जागर केला.

पालकमंत्री नितेश राणे, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत वातावरणात देशप्रेमाची ऊर्जा निर्माण केली. ‘वंदे मातरम्..! भारत माता की जय..!’ या घोषणांनी सावंतवाडीचा आसमंत अक्षरशः दुमदुमून गेला.

येथील उपरलकर देवस्थान येथून रॅलीला प्रारंभ झाला. तिरंगा हातात घेऊन आबालवृद्ध, महिला, युवक, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनीही रॅलीचे स्वागत करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यामुळे सावंतवाडी शहराला जणू देशभक्तीच्या उत्सवाचे विराट स्वरूप प्राप्त झाले होते.

‘तिरंगा हा अस्मितेचा विषय’ – पालकमंत्री नितेश राणे

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे सांगितले. देशावर प्रेम करणे आणि ‘वंदे मातरम्’ म्हणणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भारत माता की जय’चा जयघोष न करणाऱ्यांवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. अशा प्रवृत्तींवर कठोर भूमिका घेण्याची गरज असून, संबंधित संस्थांवरही कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षापेक्षा राष्ट्र प्रथम असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

”रॅलीच्या यशाचे श्रेय माजी सैनिक आणि जनतेला!” – युवा नेते विशाल परब

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी या भव्य रॅलीच्या यशाचे संपूर्ण श्रेय माजी सैनिक आणि सावंतवाडीकर जनतेला दिले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत असून, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.

विशाल परब यांच्या पुढाकारातून आणि नियोजनातून रॅलीचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. विविध भागांतून सहभागी झालेल्या नागरिकांमुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

‘सावंतवाडीची संस्कृतीच एकतेची’ – आ. दीपक केसरकर

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या संस्कृतीचा गौरव करताना देशप्रेम आणि विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे हीच सावंतवाडीची ओळख असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे देशभरात एकतेची भावना अधिक दृढ झाली आहे. भारत महासत्ता म्हणून उदयास येत असताना प्रत्येक भारतीयाने भारतमातेला वंदन करून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आपला सहभाग नोंदवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

मान्यवरांची मांदियाळी

या रॅलीला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

यावेळी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, सुदन कवठणकर, विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपाध्यक्ष गौरव मुळीक, नगरसेविका मोहिनी मडगावकर, सुनीता पेडणेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, स्नेहा नाईक, तसेच प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, संतोष राऊळ, सागर ढोकरे, महेश सारंग, जावेद खतीब, प्रसन्ना देसाई यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, माजी सैनिक, विद्यार्थी आणि हजारो देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.

तिरंग्याची शान… राष्ट्रभक्तीचा अभिमान… आणि ‘भारत माता की जय’चा निनाद! या त्रिवेणी संगमाने सावंतवाडीच्या भूमीत आज राष्ट्रभक्तीचा अविस्मरणीय अध्याय लिहिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles