सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा!, राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीची दमदार कामगिरी! ; नऊपैकी सात खेळाडूंनी पटकावली पारितोषिके.

सावंतवाडी : सातारा येथे विश्वगंगा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुसऱ्या मकरंद आबा पाटील चषक राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्गच्या बुद्धिबळ क्षेत्राचा लौकिक वाढविला. देशभरातील विविध राज्यांमधून सुमारे ३७० खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ॲकॅडमीच्या नऊ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यापैकी तब्बल सात खेळाडूंनी विविध गटांत पारितोषिके पटकावली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने रेटिंग कॅटेगरीत तृतीय क्रमांक मिळवत लक्षवेधी कामगिरी केली. नऊ फेऱ्यांपैकी सात फेऱ्यांत विजय मिळवत त्याने सात गुणांची कमाई केली. या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल ११ गुणांची वाढ झाली. बाळकृष्णला रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

तेरा वर्षीय हर्ष राऊळ याने ५.५ गुण मिळवत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक मिळविला. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये १७ गुणांची वाढ झाली. तेरा वर्षीय पुष्कर केळूसकर याने पाच गुणांसह १५ वर्षांखालील गटात पाचवा क्रमांक पटकावला.

बारा वर्षीय चिदानंद रेडकर याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर मात करत पाच गुणांची कमाई केली आणि १३ वर्षांखालील मुलांच्या गटात नववा क्रमांक मिळविला. देवगड येथील अवघ्या सात वर्षीय आकाश वाटवे याने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या खेळाडूंना पराभूत करत ३.५ गुण मिळविले. त्याने सात वर्षांखालील मुलांच्या गटात तृतीय क्रमांक मिळवत विशेष ठसा उमटविला.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या चारुल जाधव हिने ३.५ गुण मिळवत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आठवा क्रमांक पटकावला. तर मोहीशा जाधव हिने नऊ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक मिळविला. विजयी खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश संपादन केले. ॲकॅडमीच्या उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुक्ताई ॲकॅडमीच्या या उल्लेखनीय कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles