कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी सचिन सावंत यांना केंद्र सरकारकडून मानाचे पोलीस पदक सन्मान! ; २५ वर्षांच्या निष्कलंक, धाडसी आणि उल्लेखनीय पोलीस सेवेला भारत सरकारची गौरवाची सलामी! ; देवसू-दाणोली पंचक्रोशीत अभिनंदनाचा वर्षाव!

देवसू : कर्तव्यनिष्ठा, शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि जनसेवेची अखंड तळमळ या गुणांच्या जोरावर तब्बल २५ वर्षे पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावणारे पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत सावंत यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेला अखेर केंद्र सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून गौरवाची पावती मिळाली आहे. स्वातंत्र्यदिन २०२६ निमित्त भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अति उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या मानाच्या सन्मानामुळे देवसू-दाणोली पंचक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन सावंत हे मूळचे सावंतवाडी तालुक्यातील देवसू गावचे. पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी २०१० मध्ये एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण करत पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपल्या शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर नाशिक शहर क्राईम ब्रँच, नवी मुंबई, महामार्ग सुरक्षा पथक यांसह विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली.

पोलीस सेवेचे बाळकडू घरातूनच

सचिन सावंत यांचे वडील चंद्रकांत सावंत हे देखील पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे शिस्त, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचे संस्कार त्यांना बालपणापासूनच लाभले. याच संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत पोलीस दलात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

खून, घरफोडी, चोरी, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे अशा गंभीर प्रकरणांचा तपास करताना त्यांनी गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या तपासकौशल्याची आणि धाडसी कार्यपद्धतीची अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दखल घेतली.

६५ कोटींच्या अमली पदार्थांची धडाकेबाज कारवाई

चाळीसगाव महामार्ग केंद्र येथे कार्यरत असताना सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत ४३ किलो वजनाचे Methamphetamine (Psychotropic Substance) जप्त करण्यात आले. या अमली पदार्थाची किंमत तब्बल ६४ कोटी ९८ लाख रुपये होती. या मोठ्या कारवाईमुळे त्यांच्या तपासकौशल्याची आणि धाडसी नेतृत्वाची विशेष दखल घेण्यात आली.

१६० हून अधिक अपहृत मुलांना शोधून कुटुंबांच्या चेहऱ्यावर आणले हास्य

नाशिक शहरातील Anti Human Trafficking Unit येथे २०१८ ते २०२१ या कालावधीत कार्यरत असताना सचिन सावंत यांनी बेपत्ता आणि अपहृत मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली. या काळात १६० हून अधिक अपहृत मुलांचा शोध घेण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अनेक कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणि आशेचा किरण आणणाऱ्या या कामगिरीमुळे त्यांच्या सेवाभावाचे दर्शन घडले.

कोरोना काळात ‘ऑक्सिजन मॅन’ची जबाबदारी

कोविड-१९ महामारीच्या अत्यंत कठीण काळात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असताना त्यांनी पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून पार पाडली. कोरोनाबाधित ६० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. संकटाच्या काळात कर्तव्याच्या पलीकडे जाऊन केलेल्या या सेवेमुळे त्यांच्या संवेदनशील आणि माणुसकीपूर्ण कार्यशैलीची प्रचिती आली.

२५० बक्षिसे आणि २० प्रशंसापत्रे; गुणवत्तापूर्ण सेवेला पावती

कर्तव्य बजावताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सचिन सावंत यांना त्यांच्या सेवाकाळात तब्बल २५० बक्षिसे आणि २० प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहेत. गुन्हे तपासातील कौशल्य, धाडसी निर्णयक्षमता, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी या गुणांमुळे त्यांनी पोलीस दलात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

देवसूच्या मातीचा सुपुत्र; सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

तब्बल २५ वर्षांच्या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेला भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अति उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने गौरविणे, ही केवळ सचिन सावंत यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर देवसू गाव, दाणोली पंचक्रोशी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

कर्तव्याच्या वाटेवर प्रामाणिकपणा, धैर्य आणि सेवाभावाची मशाल तेवत ठेवणाऱ्या सचिन सावंत यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे देवसूच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सिंधुदुर्गच्या पोलीस सेवेचा गौरवही देशपातळीवर अधोरेखित झाला आहे.

या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत सावंत यांच्यावर देवसू-दाणोली पंचक्रोशीसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles