सावंतवाडी : “तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार आहे” अशी भीती दाखवत ओरोस येथील एका वृद्धाची तब्बल २ लाख ३८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर फ्रॉड प्रकरणातील आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी थेट झारखंडमध्ये जाऊन जेरबंद केले. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांना मोठा दणका बसला असून, PSI प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या धाडसी आणि चिकाटीच्या तपासाचे कौतुक होत आहे.
गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून संबंधित वृद्ध व्यक्तीला विश्वासात घेत सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून तब्बल ₹२,३८,५०० रुपये हडपले होते. घटना समोर आल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
सायबर गुन्ह्याचा माग काढताना पोलिसांसमोर आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, PSI प्रमोद पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासाची दिशा झारखंडपर्यंत पोहोचताच पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.
अखेर झारखंडमध्ये जाऊन आरोपीला जेरबंद करण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले. या कारवाईत PSI प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल श्री. शिंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.
सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सावंतवाडी पोलिसांची धडाकेबाज मोहीम!
स्थानिक पातळीवर घडलेल्या सायबर फसवणुकीचा तपास थेट झारखंडपर्यंत नेऊन आरोपीला अटक करण्याची ही कारवाई पोलिसांच्या तपासकौशल्याची आणि धाडसाची प्रचिती देणारी ठरली आहे. गुन्हेगार कितीही दूर लपला, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, असा संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
विशेषतः वृद्ध नागरिकांना फोन करून गॅस कनेक्शन, बँक खाते, केवायसी, वीज बिल अशा विविध कारणांचा आधार घेत फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
ओरोसच्या वृद्धाची लुबाडलेली रक्कम असो वा आरोपीचा झारखंडपर्यंतचा माग… सावंतवाडी पोलिसांनी घेतलेली ही झुंज अखेर आरोपीच्या अटकेवर येऊन थांबली. PSI प्रमोद पाटील आणि त्यांच्या पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



