सावंतवाडी : देशभक्तीच्या रंगांनी सिंधुदुर्गाची भूमी न्हाऊन निघाली असतानाच ‘हर घर तिरंगा’ अभियानातील दमदार कामगिरीने जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने थेट राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गाचा झेंडा अभिमानाने उंचावला आहे. विशेष म्हणजे आंबोली मंडळाने तब्बल १०५० अटेंडन्सची नोंद करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल भाजपचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी माजी सैनिक, भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या तमाम देशप्रेमी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच अभियानाचे संयोजक संदीप गावडे यांनी अभियानाची धुरा समर्थपणे सांभाळली.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य तिरंगा रॅली, देशभक्तीपर उपक्रम आणि विविध कार्यक्रमांनी वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून गेले. त्याचबरोबर ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमातही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत तिरंग्याप्रती असलेली निष्ठा आणि देशप्रेमाची प्रचिती दिली.
आंबोली मंडळाची विशेष कामगिरी ठरली लक्षवेधी! मंडळाने तब्बल १०५० अटेंडन्सची नोंद करत सरल अॅपवर प्रभावी रिपोर्टिंग केली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. दुसरीकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवत जिल्ह्याच्या कामगिरीला राज्याच्या पटलावर झळकवले.
याचबरोबर कणकवली विधानसभा मतदारसंघाने राज्यात सहावा क्रमांक, तर कुडाळ विधानसभा मतदारसंघाने राज्यात दहावा क्रमांक पटकावत आपली छाप उमटवली. कणकवली शहर व ग्रामीण मंडळातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तिरंगा सेल्फी अपलोड करत अभियानाला जोरदार प्रतिसाद दिला. कुडाळ मंडळाच्या उल्लेखनीय सहभागामुळे कुडाळ विधानसभा मतदारसंघानेही राज्याच्या क्रमवारीत मानाचे स्थान मिळवले.
दरम्यान, डोंबिवली विधानसभा मतदारसंघाने राज्यात तिसरा क्रमांक, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या राष्ट्रभक्तीची ताकद पुन्हा एकदा राज्यभर अधोरेखित झाली आहे.
“यावेळी सिंधुदुर्गाने राज्यात दुसरे स्थान मिळवले; मात्र पुढील वेळी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सिंधुदुर्गाला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा संकल्प आहे,” असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला.
तिरंग्याच्या सन्मानासाठी एकजूट झालेल्या सिंधुदुर्गाने आकडेवारीतही अव्वल ठसा उमटवत ‘देशभक्तीचा झेंडा’ राज्याच्या नकाशावर पुन्हा एकदा दिमाखात फडकवला आहे!



