सिंधुदुर्ग : सामाजिक बांधिलकी, युवकांच्या विकासाची धडपड आणि समाजोपयोगी उपक्रमांची अखंड वाटचाल याची दखल घेत कोकण संस्थेला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार (सन २०२४-२५) प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित शासकीय कार्यक्रमात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. ना. श्री. नितेश नारायण राणे, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर आदी मान्यवरांच्या हस्ते कोकण संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने संस्थापक दयानंद कुबल आणि संस्था सदस्य योगेश भोसले यांच्यासह कोकण संस्थेचे कार्यकर्ते प्रथमेश सावंत, तन्वी केसरकर, ऋचा पेडणेकर, वैधवी म्हाडगुत, गौरी आडेलकर, समीर शिर्के, स्वाती मांजरेकर, शशिकांत कासले, चेतन धरणे, वैष्णवी म्हाडगूत, निलेश खामकर आदी उपस्थित होते.
१५ वर्षांची समाजसेवा ठरली पुरस्काराची मानकरी !
गेल्या १५ वर्षांपासून कोकण संस्था सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, युवक विकास तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे. समाजातील विविध घटकांना सोबत घेत संस्थेने उभारलेल्या या सेवाव्रताची शासनाने दखल घेत प्रतिष्ठेच्या जिल्हा युवा पुरस्काराने संस्थेचा गौरव केला.
केवळ पुरस्कार नव्हे, तर वर्षानुवर्षे निस्वार्थपणे सुरू असलेल्या समाजसेवेवर उमटलेली शासनमान्यतेची मोहोर म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे. संस्थेच्या या यशामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.
युवकांच्या नेतृत्वाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न –
जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि विकासात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, तसेच युवकांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान केला जातो.
कोकण संस्थेला मिळालेल्या या सन्मानामुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजसेवेच्या या प्रवासाला आता पुरस्काराच्या सन्मानाची नवी ऊर्जा लाभली आहे. सिंधुदुर्गच्या सामाजिक क्षेत्रात या गौरवामुळे आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



